Saturday, March 26, 2011

शिक्षण आणि बहुआयामी बुद्धिमत्ता.

एक आयुष्यभर छळणारा प्रश्न. शिक्षण आणि बुद्धिमत्तेचा नेमका संबंध काय? आपली सद्य शिक्षण व्यवस्था का निर्माण झाली? निर्मिति वेळची तिची उद्दीष्टे आज ही उपयुक्त आहेत का? तिचा आढावा कोण घेतो? कालानुरूप ती बदलत का नाही? शालेय शिक्षण आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकणार नाही हे मान्य आहे, पण किमान गरजा तरी पूर्ण करते का ? गणित, विज्ञान किंवा भाषा यांच्या शिवाय/ व्यतिरिक्त शिक्षण असू शकते हे आपल्याला मुळी मान्यच नाही. शालेय शिक्षण गरजेचे आहे हे मान्य करूनही या शिक्षणाचे उद्दीष्ट, एकाला विद्वान ठरविणे आणि दुसर्‍याला मागे टाकणे, हरविणे; विजयी होणे आणि पराभूताला कमी लेखणे हे कधी झाले? बरं या तथाकथित "विद्वानांचे" सामान्य ज्ञान तरी धड असेल म्हणावे, तर तसे ही दिसत नाही. काळ बदलला, स्पर्धा वाढली, गरजा बदलल्या वगैरे निरर्थक बाबी बडबडून आम्ही धावतोय. शिक्षण पुन्हा जैसे थे च. 

आम्ही मुलाला नव्वद टक्के मिळाले पाहिजेत म्हणून बजावतो. सायन्सलाच टाकतो आणि बारावीला पुन्हा टक्क्यांची अट घालतो. ते मिळाले तर मेडिकल ( आद्य !) , आयआयटी, इंजिनिअरींग, आर्किटेक्चर, सध्या आयटी, एमबीए आणि एकादी परदेशी फुटकळ पदवी इतके मिळवून दिले की झाली पालकांची इतिकर्तव्यता. आता आमचा/ची पुत्र/त्री झोकात यशस्वी जीवन जगणार हा होरा. यशस्वी जीवनाची आमची व्याख्या काय? तर उच्च शिक्षणाद्वारे मोठ्या  पदावर पोहोचून त्या योगे बक्कळ (?) पैसा मिळवणे !!

एकाद्याचं मुल या मर्यादेत बसत नाही तेव्हा काय होतं? तो/ ती हलक्या (?) किंवा खालच्या (!) स्तरातून आल्यामुळे त्यांना एवढंच मिळणार हे खुद्द त्यांना ही पटेल इतक्या ठासून आम्ही सांगतो. जर ते मुल जरा बर्‍या घरातून आले असेल तर , “अमक्याचा मुलगा मतिमंद आहे.” किंवा “तमक्याचा मुलगा फुकट गेला.”, हे आम्ही खालच्या आवाजात गावभर कुजबुजतो. मग त्या बद्दल चुकचुकतो आणि खोटी, निरर्थक चिंता दाखवतो. "कसं होणार हो यांचं?" आम्ही उपाय सुचवत नाही, खोटी करूणा ओकतो.


धुनिक शिक्षणाचे हे चित्र खरे आहे का तो आपला समज आहे; हे कोणालाच पडताळून पाहावेसे वाटत नाही. आम्ही व्यवस्था शरण... आम्ही व्यवस्थेला मान्यता देतो, तिला प्रतिप्रश्र्न करित नाही. जर आम्ही हे प्रश्र्न केले तरी ही  व्यवस्था ढीम्म हलत नाही. मग आम्ही आणखी ’उच्च’ होण्यासाठी  आयसीएसई, सीबीएसई वगैरेंच्या मागे धावतो. तिथे ही थकलो की मग मुलाला इन्टरनॅशनल स्कूल मध्ये अभिमानाने पाठवतो.  या सगळ्यात या देशातली, या समाजातली ८०- ९० टक्के मुले परीघा बाहेरच आहेत याची आम्हाला खंतच नाही , कारण ती दुसर्‍यांची मुले आहेत. आम्ही केवळ आपल्यापुरते पाहतो. किंबहुना ती मुलं परीघा बाहेर आहेत आणि आमचा मुलगा परीघात आहे याचा आम्हाला अभिमानच वाटतो. 

असे आम्ही सुसंस्कृत, एक सुशिक्षित समाज घडवायला निघालो आहोत. शिक्षणाची दुकाने तर गल्लोगल्ली उघडलेली आहेत. त्यांमध्ये प्रवेशासाठी आम्ही लाखो रूपये मोजत आहो. शिक्षणावर वीस-पंचवीस लाख खर्च करून महिना चाळीस हजार कमावणारा डॉक्टर किंवा इंजिनिअर पाहिले की वाटते हा तर आतबट्ट्याचा व्यवहार झाला. आता हा डॉक्टर किंवा इंजिनिअर जे कमावतोय त्यात त्याच्या शिक्षण खर्चाच्या रकमेचे व्याज आणि शिक्षण ख्रर्चाची रक्कम वजा जाता त्या/तिची पहिली कमाई व्यवसायाच्या कितव्या वर्षी होईल? आणि किती वर्षे हा व्यवसाय तो/ ती करेल? संपूर्ण आयुष्याची एकंदर कमाई किती असेल? हे गणित, गणितात १०० मार्कस सातत्याने मिळावणार्‍यांना ही करता येत नाही. एकंदर पाहता  जगण्याच्या उंदीरदौडीपुढे जगण्याची उद्दीष्टे हरवून बसलेला समाज असं आपलं साधारणपणे वर्णन करता येईल. आपण का जगतोय हा प्रश्र्न आसपास विचारून पहा. उत्तरे ऐकून मला आपले वर्णन सतत सबबी पुढे करणारा समाज असे ही दिसते. अजून मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, मोठे घर, गाडी, परदेशवारी वगैरे आपल्या जगण्याची उद्दीष्टे आहेत. या उद्दीष्टां मागे धावतानाच वॉरन बफे, बिल गेटस किंवा आपल्याकडे अझिम प्रेमजी, नारायण मूर्ति यांची उदाहरणे आणि आदर्श ही आम्ही आपल्या मुलांना देतो. त्यांची जगण्याची उद्दीष्टे देत नाही.


आपण का जगतोय हा प्रश्र्न आसपास विचारून पहा. उत्तरे ऐकून मला आपले वर्णन "सतत सबबी पुढे करणारा समाज." असे ही दिसते. अजून मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, मोठे घर, गाडी, परदेशवारी वगैरे आपल्या जगण्याची उद्दीष्टे आहेत. या उद्दीष्टां मागे धावतानाच वॉरन बफे, बिल गेटस किंवा आपल्याकडे अझिम प्रेमजी, नारायण मूर्ति यांची उदाहरणे आणि आदर्श ही आम्ही आपल्या मुलांना देतो. त्यांची जगण्याची उद्दीष्टे देत नाही.

मुल पाच वर्षांचे झाले की शाळेत दाखल होते. शिक्षक म्हणजे पुढची पिढी घडवणारे, ते त्या विषयातले उत्कृष्ट असावेत असे आपल्याला वाटते. पण उत्कृष्ट कुठे आहेत? तर राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय कारभारात मोठ-मोठ्या पदांवर पोहोचलेत. शिकवणे हे काम उर्वरितांचे. अभ्यासक्रम पुर्वी कधीतरी बनवलेला. तोच वारंवार सुधारायचा. आजच्या गरजा घाला रे त्यात, म्हणून मग कम्प्युटर वगैरे विषय त्यात घालायचे. शालेय शिक्षणाच्या एका ही वर्षात “करीअरची निवड” हा विषयच नाही. मुलांचा कल ओळखून देणारी परिक्षाच नाही. मुलांच्या कलानुसार आवडी- निवडीनुसार मुलांची विभागणी ही नाही. गणित येत नाही ? मग तू ’ढ’ अशी सरळ विभागणी. नव्वद टक्के मुलांना आयुष्यात सुमार किंवा अपयशी ठरवणे हे आपल्या शिक्षण पद्धतीचे उद्दीष्ट आहे का असा भयावह प्रश्र्न अनेकदा पडतो.

शिक्षण संस्थांना त्यांच्या पदाधिकार्‍यांना नावे ठेवणे आम्हाला आवडते. त्यांचे प्रश्र्न समजुन घ्यायची गरज वाटत नाही. ज्याला आपण कर देतो ते सरकार, शिक्षण संस्थेच्या पायाभूत सुविधांना मदत करत नाही, कारण तिथे भ्रष्टाचार होतो हे आम्ही गृहीत धरलेले आहे. ग्राण्ट इतकी किरकोळ, की खर्च भागवण्यासाठी संस्थेला नानाविध क्लुप्त्या शोधायला लागतात. मग पालक संस्थेच्या नावाने खडे फोडतात. पालकांनीच शाळा चालवायला घेतल्याची कुठे उदाहरणे नाहीत. सत्तेत आलेले शिक्षणाकडे कुरण म्हणून बघतात. आपल्या काट्या-चमच्यांना संस्था उभारण्यासाठी जमिन आणि अनुदाने मिळवून देण्याचे काम करतात. त्या संस्थांच्या चिरेवर-दगडावर आपले नांव कोरले जाईल अशी व्यवस्था करतात. यात मूलभूत शिक्षण व्यवस्था, त्यातील परिवर्तन किंवा मुलांची बुद्धिमत्ता आणि तिचा विकास यावर विचार करण्या इतपत वेळ आहे कोणाला?

जगभरातील शिक्षणक्षेत्रांत कोणते बदल होताहेत? डॉक्टर हॉवर्ड गार्डनर कोण? “बहुआयामी बुद्धिमत्ता” ही त्यांची कल्पना काय सांगते? तिने शिक्षण क्षेत्रात कोणते बदल घडवून आणले? याचा वारा देखील आम्ही आमच्या शिक्षण क्षेत्राला लागू दिलेला नाही. प्रश्र्न आहे, शिक्षण व्यवस्थेने आपल्या मुलांना जो दर्जा दिला तो मान्य करून आयुष्यभर मिरवायचे, की ते निकष अमान्य करून पुढे जायचे ? जगातली सर्वात शक्तिशाली गोष्ट जी बुद्धिमत्ता, ती प्रत्येकाकडे आहेच, फक्त तिचा स्रोत आणि उगम आपल्याला शोधायला हवा. हा स्रोत शोधून देईल ती खरी शिक्षण व्यवस्था. डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांच्या एका वाक्यानेच आपण इथे थांबू... “आपले मुल किती हुशार आहे हा मुळात प्रश्र्नच नाही, तर प्रश्र्न हा आहे की आपले मुल कशा प्रकारे हुशार आहे !”
- आभास आनंद
abhas_n@hotmail.com